शिवाई मंदिर, शिवना
ता. सिल्लोड, जि.औरंगाबाद
मंदिराची वेळ
सकाळी ५.०० ते रात्री ८.००
शिवाबाई हे संस्थान सुमारे 300 वर्षापूर्वीचे जाग्रृत शक्तीपीठ आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या शिवाई देवी मंदिराला मोठे महत्त्व आहे. सुमारे आठशे वर्षापूर्वी शिवना या गावाचे नाव शिवपूर असे होते. गावाच्या उत्तरेस पाच किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत शहादरी नावाचे छोटेसे गाव वसलेले होते. बहुतेक गवळी, गुराख्यांची वस्ती असलेल्या या गावातून शिवा नावाचा गवळी रोज दही, दूध, घेऊन येथे विक्रीसाठी घेऊन येत असे.
गावालगत असलेल्या खोलेश्वर मंदिरातील शिवलिंगावर दही वाहून तो दर्शन करून जात असे. या नित्यक्रमात त्याने कधीही खंड पडू दिला नाही. शिवाला संतती नसल्यामुळे तो सदैव दु:खी राहत असे. एके दिवशी शिवा असाच व्याकुळ होऊन दर्शन घेत असतांना त्यास भोलेनाथ प्रसन्न झाले व त्यांनी वर मागावयास सांगितले. शिवाने संततीसुख मागितले. महादेवाने तथास्तू म्हटले. पण एक अट टाकली की, तुला मुलगी होईल; पण ती जास्त दिवस तुझ्या सान्निध्यात राहणार नाही.
एका वर्षानतंर शिवा गवळ्याच्या सौभाग्यवतीने एका गोंडस मुलीस जन्म दिला. मुलीच्या जन्माने शिवा खुप आनंदला. मोठ्या उत्साहाने तिचे नामकरण " शिवाई " असे करण्यात आले. पाच-सहा वर्षानंतर मुलगी जेव्हा चालायला लागली तेव्हा शिवा तिला घेऊन महादेवाच्या दर्शनासाठी आला.
शिवाईने बाबांना सांगितले की, तुम्ही दुध- दही विकून परत या. मी मंदिरात थांबते. शिवाने होकार दिला. तो चार-पाच पावले पुढे गेला व मागे वळून पाहिले तर शिवाई गुप्त झाली. तिथेच शिवाईचे भव्य व सुंदर असे मंदिर उभारले गेले.
शिवाईच्या नावावरून या गावचे नाव शिवना हे नांव पडले आहे..याप्रमाणे शिवाबाईचा अल्प इतिहास आहे.
या देवी सर्वभुतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता
या देवी सर्वभुतेषु शक्तिरूपेण संस्थिता
या देवी सर्वभुतेषु मातृरूपेण संस्थिता
या देवी सर्वभुतेषु बुद्धिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ||
प्रेक्षणीय स्थळे
जवळपास असणाऱ्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती